तुम्ही आहात तरी कोण ? तुमची ओळख आहे तरी काय ?

शासकीय अधिकारी हा शब्द उच्चारला की डोळ्यांसमोर येते एक जबाबदारीची शिस्तीची आणि सेवाभावाची प्रतिमा. पण आज वास्तव काय आहे ? जनतेच्या कराच्या पैशावर पगार घेणारे हेच काही अधिकारी स्वतःला जनतेचे मालक समजू लागले आहेत. “ जनसेवक ” ही ओळख मागे पडली आहे आणि “ खुर्चीचा बादशहा ” ही मानसिकता पुढे आली आहे. हा बदल केवळ दुर्दैवी नाही तर लोकशाहीच्या मुळांवर घाव घालणारा आहे. सरकारी कार्यालयात पाऊल टाकताच सामान्य माणसाची जी अवस्था होते ती पाहून प्रश्न पडतो ही व्यवस्था नेमकी कुणासाठी आहे ?
जनतेसाठी की खुर्चीवर बसलेल्या काही अहंकारी अधिकाऱ्यांच्या मनमानीसाठी ? एका साध्या कामासाठी माणूस चार-चार , पाच-पाच वेळा चकरा मारतो . प्रत्येक वेळी नवा बहाणा “ साहेब मिटिंगमध्ये आहेत ” , “ फाईल वर गेलीय ”, “ आज सिस्टम बंद आहे ”, “ उद्या या ” आणि उद्या कधीच येत नाही हेच अधिकारी ज्यांना सरकारने जनतेची सेवा करण्यासाठी नेमलं आहे ते स्वतःला इतकं व्यस्त दाखवतात की जणू काही देशाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. प्रत्यक्षात मात्र वातानुकूलित दालनात बसून फालतू गप्पा मोबाईलवर वेळ घालवणं आणि काम पुढे ढकलणं हीच त्यांची दिनचर्या बनलेली आहे. फोन उचलणं तर दूरच अनेकदा तो मुद्दाम टाळला जातो. कारण ? “ जनतेशी बोलणं म्हणजे त्रास ” प्रश्न असा आहे,ही प्रवृत्ती निर्माण झाली कुठून ? यामागे एकच कारण आहे उत्तरदायित्वाचा अभाव … जेव्हा एखादा अधिकारी वेळेवर काम करत नाही लोकांना भेटत नाही त्यांच्याशी उद्धटपणे वागतो तेव्हा त्याच्यावर तात्काळ कारवाई होत नाही . उलट त्याला मोकळीक मिळते. “ कुणी काहीच करू शकत नाही ” हा गैरसमज त्याच्या मनात पक्का होतो . आणि मग सुरू होतो अहंकाराचा खेळ.
ही केवळ व्यक्तीगत समस्या नाही ही संपूर्ण यंत्रणेची विकृती आहे. कारण या प्रवृत्तीला खतपाणी घालणारी व्यवस्था आहे जिथे तक्रारी फाईलमध्येच गाडल्या जातात जिथे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करतात आणि जिथे जनतेला न्याय मिळवण्यासाठी स्वतःचीच ऊर्जा खर्च करावी लागते. याहूनही गंभीर बाब म्हणजे सामान्य माणूस हळूहळू या अन्यायाला सरावतो आहे. “ सरकारी काम म्हणजे वेळ लागणारच ” हा समज इतका खोलवर रुजला आहे की लोक अन्याय सहन करायला तयार झाले आहेत. पण हा समजच चुकीचा आहे सरकारी काम वेळेत होणं ही जनतेची हक्काची अपेक्षा आहे उपकार नाही .
अनेकदा असेही दिसते की एखादा माणूस प्रभावशाली असेल ओळखीचा असेल किंवा ‘ वरून फोन ’ असेल तर त्याचं काम काही मिनिटांत होतं. मग प्रश्न पडतो हीच का समानतेची लोकशाही ? सामान्य माणसासाठी नियम वेगळे आणि ‘ओळख ’ असणाऱ्यांसाठी वेगळे ही दुहेरी भूमिका कोणत्या न्यायात बसते ? या सगळ्या परिस्थितीत एक गोष्ट स्पष्ट आहे
खुर्चीवर बसल्यानंतर काही अधिकाऱ्यांना ‘ सेवा ’ नाही, तर ‘ सत्ता ’ दिसते. त्यांना वाटतं लोक त्यांच्या दारात उभे आहेत म्हणजे ते मोठे झाले. पण ते विसरतात हीच जनता त्यांना त्या खुर्चीवर बसवणाऱ्या व्यवस्थेचा पाया आहे.
अशा मुजोर प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांनी एक गोष्ट पक्की लक्षात ठेवावी की अहंकार कधीच टिकत नाही . आज जो अधिकारी जनतेला वेळ देत नाही उद्या त्यालाच निवृत्तीनंतर त्या जनतेसमोर उभं राहावं लागतं . तेव्हा ना खुर्ची असते ना अधिकार . फक्त उरतो तो वर्तनाचा ठसा . केवळ टीका करण्यासाठी नाही, तर हा इशारा आहे . त्या अधिकाऱ्यांना जे अजूनही स्वतःला जनतेपेक्षा ‘ वरचढ ’ समजतात. तुमचा पगार हा जनतेच्या घामाचा आहे.
तुमची खुर्ची ही कायमस्वरूपी नाही मात्र तुमचं वर्तन हे कायम लक्षात राहणार आहे.
जनतेला त्रास देणं त्यांना फिरवणं त्यांच्या सहनशक्तीची परीक्षा घेणं ही तुमची ताकद नाही तर तुमची कमजोरी आहे . कारण ज्याच्याकडे खऱ्या अर्थाने क्षमता असते तो कामातून चमकतो अहंकारातून नाही.
तितकंच महत्त्वाचं म्हणजे जनतेनेही आता गप्प बसणं थांबवायला हवं . प्रश्न विचारायला हवेत . तक्रारी करायला हव्यात . हक्कासाठी उभं राहायला हवं . कारण लोकशाही ही केवळ मतदानापुरती मर्यादित नसते ती जागृती आणि सहभागावर टिकते. आज गरज आहे ती एक स्पष्ट संदेश देण्याची “ जनतेला त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना आता माफी नाही ”
जे अधिकारी प्रामाणिकपणे काम करत आहेत त्यांचा सन्मान केला पाहिजे . पण जे आपल्या वर्तनाने संपूर्ण यंत्रणेला बदनाम करत आहेत त्यांना आरशासमोर उभं करून त्यांचा चेहरा दाखवण्याची वेळ आली आहे. शेवटी एकच प्रश्न त्या सर्वांना “ तुम्ही स्वतःला समजता तरी कोण ? ” जनतेच्या पैशावर जगणारे जनतेच्या सेवेसाठी नेमलेले आणि जनतेला उत्तरदायी असलेले यापलीकडे तुमची ओळख तरी काय आहे ?
जर याचं उत्तर सापडलं तर बघा आणि सुधरा नाहीतर जनतेचा संताप कधी उसळेल हे सांगता येत नाही आणि तो उसळला तर कोणतीही खुर्ची त्याला थांबवू शकणार नाही.









