चाळीसगाव : चाळीसगाव येथील महात्मा फुले सामाजिक व शैक्षणिक विकास मंडळ संस्थेचे सचिव अशोक हरी खलाणे यांनी फिर्याद दिली की त्यांनी जयहिंद माध्यमिक विद्यालयाच्या १५ शिक्षकांना गैरवर्तनाबद्दल शिस्तभंगाची कारवाई करून सेवा समाप्तीचे आदेश दिले होते.
त्याचा राग येऊन शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्याने शिक्षण विभागाने संस्थेवर प्रशासक नेमला होता.उच्च न्यायालयाने प्रशासकाचा आदेश रद्द केला होता. तसेच खलाणे यांच्या विरोधातील गुन्ह्यात त्यांना जामीन मिळाला होता. त्याबाबत अनंत निकम रा अमळनेर याने त्याच्या फेसबुकवरून संस्थेच्या विरोधात खोटी व बदनामीकारक माहिती प्रसिद्ध केली होती. याबाबत त्यांच्या परिचयाच्या लोकांनी अनंत निकम यांच्याशी बोलणे केले असता त्याने अमळनेर येथे बोलावले.त्यावेळी अनंत निकम याने त्याच्या कार क्रमांक एम एम ०४ सी जे ५९९९ मध्ये बसवून फेसबुक वर माहिती प्रसारित करू नये म्हणून २५ लाख रुपयांची खंडणी मागितली.
मात्र खलाणे यांनी ही बाब न्यायप्रविष्ट असून चुकीची माहिती प्रसिद्धी करू नको असे सांगितले. मात्र तरीही अनंत निकम यांनी सतत फेसबुकवर व्हिडीओ टाकून संस्थेची बदनामी केली. पुन्हा एकाने निकम यांच्याशी संपर्क साधून रक्कम कमी करण्याची मागणी केली तेव्हा अनंत निकम यांनी व्हिडीओ प्रसारित करायचे नसतील तर ४ ते ५ लाखांची मागणी केली. यावरून खलाणे यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम ३०८(२),३०८(३) प्रमाणे खंडणीचा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड करीत आहेत.