प्रतिनिधी।धुळे
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा अंतर्गत पोकरा योजनेत धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचा समावेश करावा अशी मागणी पणन मंत्री जयकुमार रावल यांनी कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फणवीस यांच्या कडे केली होती. नानाजी देशमुख कृषी संजीवनी पोकरा योजनेत काही तांत्रिक कारणामुळे दोन्ही जिल्हे येत नाहीत. परंतु, पोकरा योजनेच्या धर्तीवर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यासाठी नवी योजना देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मंत्री जयकुमार रावल यांना आश्र्वासित केले.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा)योजनेत महाराष्ट्रातील एकूण 21 जिल्ह्यांतील 6959 गावांचा समावेश आहे. या योजनेत पूर्वी 16 जिल्ह्यांचा समावेश होता, ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, धाराशीव, लातूर, नांदेड, हिंगोली, अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ, बुलडाणा, वर्धा, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांचा समावेश होता. आता विदर्भातील उर्वरित नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांचाही समावेश करण्यात आला आहे.धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचा विचार करता या जिल्ह्यांमध्येही नानाजी देशमुख कृषी संजीवनी पोकरा योजना राबविण्यात यावी अशी मागणी होत आहे. परंतु काही तांत्रिक कारणामुळे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचा पोखरा योजनेत समावेश करता येत नाही त्यासाठी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पोकराच्या धर्तीवर नवीन योजना देण्याचा सरकारचा विचार सुरू आहे.लवकरच ही नवी योजना सुरू होणार आहे.